Thursday, July 20, 2017

पाणी

पाण्यात पाहुनी भिजला चिंब
लोचनी तेथे अपुले प्रतिबिंब
पाण्यात पाहुन नाहीच भागले
पाणीचं पाजू, मागेच लागले
पाणी जोखले अंती अखेरी
पाणी जाहले काळजाचे वैरी
शेवटी पाणीचं अळवावरचे हाती
पाण्यात पाहुन लागली माती

पाण्यात पाहणे’ म्हणजे एखाद्याचा खूप द्वेष करणे. पाण्यात पाहुनी भिजला चिंबम्हणजे आपल्यापेक्षा कर्तृत्वाने मोठ्या व्यक्तीला पाण्यात पहिले तर तुम्ही स्वतःच त्या इर्षेत भिजता. आणि तिथे आपल्याला स्वतःचेच प्रतिबिंब दिसते, म्हणजे स्वतः आपण किती खुजे आहोत ते दिसते. म्हणुन दुसरी ओळ “लोचनी तेथे अपुले प्रतिबिंब”.
एखाद्याला पाण्यात पाहुन शांत नाही बसवले गेले म्हणून त्याला ‘पाणी पाजायला’ म्हणजे पराभव करायला, चीत करायला मग मन मागेच लागले. या अर्थाच्या पुढल्या दोन ओळी, “पाण्यात पाहुन नाहीच भागले, पाणीचं पाजू, मागेच लागले”.
पाणी पाजण्याच्या नादात त्या व्यक्तीचे “पाणी जोखले” म्हणजे त्या व्यक्तीची खरी कुवत, महती ओळखली, कळली शेवटी आणि नको होत या फंदात पडायला म्हणुन “काळजाचे पाणी झाले” म्हणजे भीती वाटली (पराभवाची). इथे वैरी म्हणजे मनाला म्हंटल आहे . कारण मनाने हे सगळं (पाणी पाजायचं वगैरे) सुचवलेलं होतं म्हणुन. या अर्थाच्या या ओळी “पाणी जोखले अंती अखेरी, पाणी जाहले काळजाचे वैरी”

इतका सगळा खटाटोप करूनही, शेवटी मनातला दाह काही कमी होत नाही, इर्षा काही कमी होत नाही आणि क्षणभंगुरत्व हाती येत, म्हणजे समोरच्या च्या पराभव करू न शकल्यामुळे आलेलं क्षणभंगुरत्व. म्हणून त्याला अळवावरच्या पाण्याची उपमा दिली आहे. अळवावरचे पाणी.’ याचा अर्थ होतो एखादी क्षणभंगुर गोष्ट. आणि  म्हणुन शेवटी सांगितल आहे की कोणालाही ‘पाण्यात पाहु’ नये कारण शेवटी मातीच हाती लागते...म्हणजे दुखच हाती लागते. त्या पेक्षा आपल्या पेक्षा मोठ्या (वयाने नाही, कर्तृत्वाने) माणसांकडे आदरपूर्वक पाहुन त्यांच्या कडून शिकून घ्यावे, inspiration घ्यावे, ना की त्यांना पाण्यात पाहावे. या अर्थाच्या शेवटच्या ओळी, “शेवटी पाणीचं अळवावरचे हाती, पाण्यात पाहुन लागली माती”.

सारंग कुसरे