Thursday, December 31, 2020

३० मिनिटं

तो : ठरलं तर मग... प्रत्येक विकेंड ला फक्त ३० मिनिटांचं सेशन..!

ती : पण ३० मिनिटात होईल सगळं... आय मिन ३० मिनिटांपेक्षा जास्त पण लागू शकतात...बहुदा लागतीलच..!!

तो : लेट्स सी...सुरुवात महत्वाची...!

ती : हम्म...पण हे ऑल ऑफ अ सडन कसं काय सुचलं...म्हणजे व्हाट्स द इन्स्पिरेशन? 

तो : अगं काही नाही...म्हंटल काही तरी नवीन करून पाहू नवीन वर्षात...कारण त्या मागची आपली भावना, आपला ऍटिट्यूड हा पॉसिटीव्ह आहे..!!

ती : पण आठवड्याभरात तर किती तरी गोष्टी खटकू शकतात, कितीतरी गोष्टी "बोलायचंच आहे नंतर" च्या सबबीखाली न बोलताच विसरून जाण्याची शक्यता जास्त आहे आणि शिवाय काही गोष्टीतील तो स्पार्क, ती स्टीम निघुन गेलेली असेल ती वेळ येई पर्यंत...त्याचं काय?

तो : अगं तीच तर खरी मेख आहे यातली... म्हणजे तूच बघ नं... ज्या गोष्टी रागाच्या भरात बोलल्या जाण्याची शक्यता आहे...त्याला एक सुजाण फिल्टर मिळेल...म्हणजे अगदी "रिऍक्ट" करण्या आधी त्या गोष्टीला एक थॉट मिळेल की "अरे, जाऊ दे हे तेव्हाच बोलू" आणि त्यानी कदाचित आपण "रिऍक्ट" न करता आपण "रिस्पॉन्ड" करायला शिकू...हे होईलच याची शाश्वती नाही...पण कुठलीही गोष्ट ट्राय केल्याशिवाय कळात नाहीच...सो लेट्स गिव्ह इट अ हार्टफेल्ट ट्राय !!

ती : (हासत) मला तर तुझा स्वभाव बघता तूच अनेक फाऊल करशील असं आत्ताच वाटतंय...!!

तो : आगे आगे देखो मॅडम होता है क्या...!

ती : अरे साधंच बघ नं...म्हणजे सोमवारी भाजीत मीठ कमी झालं आहे हे तू मला येणाऱ्या शनिवारी सांगणार आहेस का?

तो : देयर यू गो...मला हा प्रश्न अपेक्षित होताच... तर मॅडम त्याचं उत्तर असं आहे की...भाजीत मीठ कमी झालं आहे हे मी तुला तेव्हाच सांगणार पण त्या बद्दल ची नाराजी किंवा चीड-चीड म्हण हवं तर ते फक्त पोस्टपोन करणार आणि ते तुला शनिवारी सांगणार...जर त्या बद्द्लचा माझा त्रागा तोवर टिकला तर...विच इस हायली अनलायिकली...आलं लक्षात?

ती : हे खुपच "आयडियल" होईल असं नाही वाटत तुला? म्हणजे तू सोमवारी ओला टॉवेल गादीवर तसाच टाकला किंवा मला बुधवारी घरकामात मदत नाही केलीस तर मी त्याचा उल्लेख फक्त त्या तीस मिनिटात आणि ते ही काही दिवसांनी शनिवारी करायचा...आय डाऊट धिस विल वर्क..!!

तो : आय नो थोडं कठीण आहे हे पण या फिल्टर मुळे बऱ्याचशा  नको त्या क्षुल्लक गोष्टी एलिमिनेट होतील असं मला वाटतं...! आणि काही औंशी फ्रिकशन कमी होईल कदाचित..! आणि शेवटी घडलं तर काही तरी चांगलंच होईल पण वाईट मात्र काही होणार नाही

ती : वाईट नक्की नाही होणार...हाऊ कॅन यू बी सो शुअर? 

तो : तसे नियमच आखून देणार आहे...रूल्स ऑफ प्ले...यू नो..!!

ती : अरे पण त्या तीस मिनिटात जर शब्दाला शब्द वाढत गेला तर...?

तो : "टाइम-बॉक्स" करायचा प्रत्येक इशू...म्हणजे ऍटलीस्ट तसा प्रयत्न करायचा. फॉर एगझॅम्पल त्या आठवड्यात मला जर तुझ्या एखाद्या वाक्याचा किंवा त्याच्या टोन चा राग आला असेल तर त्या बद्दल आपण एका ठराविक वेळेपुरतं बोलायचं आणि तो इशू मोकळा करायचा...त्याचा पाल्हाळ लावायचा नाही की मागचं काही उकरून काढायचं नाही...हे ऐकताना खूप छान वाटतं आहे...सुरवातीला खूप चुका होतीलही...जास्त वेळ लागेलंही बरेचदा...पण ऍम रिअली अप फॉर इट..!! आपण हळू हळू ते को-कॉउंसेल्लिंग आर्ट मास्टर करू !!

ती : चला तर मग मी लिस्ट करायला घेते..!

तो : हो बट द लिस्ट हॅज टू बी मेंटल... लिखित नाही... 

ती : का बरं...एनी स्पेसिफिक रिजन ?

तो : हो कारण त्याने लिस्ट एंडलेस होणार नाही आणि दुसरं कारण कि मन फक्त त्याचं गोष्टी लक्षात ठेवतं ज्या त्याला ठेवायच्या असतात किंवा जिथे ते जास्त इम्पॅक्ट झालं असतं...बऱ्याचशा मायनर कुरबुरी मन लक्षात ठेवत नाही...असं आत्ता तरी मला वाटतंय..!!

ती : ओके पॉईंट नोटेड..!!

(इतकं बोलुन झाल्यावर "तो" भाजी आणि किराणा आणायला बाहेर जातो आणि किराणा आणल्यावर त्यावर "ती" म्हणते...)

ती : (चिडून) अरे मेथीच्या  २ जुड्या आधीच घरी होत्या...का आणल्यास परत...तू निवडणार आहेस का आणि कोथिंबिरीच्या वर सगळी भाजी आणली...कोमेजली ना ती...तुला साधी भाजी पण नीट आणता येत नाही...आपलं लग्न होऊन आता वीस वर्ष होतील पण.... 

तो : ("ती" चं वाक्य मधेच तोडत) मॅडम या बद्दल आपण शनिवारी बोलू... दे त्या चारही जुड्या, आताच निवडायला बसतो...हा गुंता आपण शनिवारी सोडवू !!

ती : (हासत) वा चांगली पळवाट आहे..!!

तो : आहेच मग..."हीच" तर खरी गम्मत आहे (डोळा मारत हसतो)


सारंग कुसरे

Friday, June 19, 2020

कवितायनमः

लिहावं जर सोपं, तर म्हणतात "जरा खाजवायला देत जा की डोकं"
अन जर का लिहावं गुढ, तर म्हणतात "कशाला गाठताय अनाकलनियतेची टोकं"
बरं जर लिहिलं छंदात,
तर म्हणतात "तुम्ही नकाच पडू न या फंदात"
अन जर मुक्तछंदलो जरासं, तर म्हणतात ,
"छंद, मात्रा, गण ठाऊक आहे का कशाशी खातात ??"
मग वरून परत विचारतात, "वाचलंय का अमकं-तमकं, वाचलाय का हा कवी ??"
अन जर म्हंटल हो , तर म्हणतात, " नुसतं वाचून काय होतं, ती प्रतिभा कवितेत दिसायला हवी"
कसं, काय आणि किती सांगावं या शहाण्यांना दिड
ज्यांना कायम वाटतं की दुसऱ्यांच्या बुद्धीला आणि कल्पकतेलाच तेवढी लागलीय कीड
एक मात्र खरं की, गुढ लिहिण असतं सोपं अन सोपं लिहिणं सगळ्यात कठीण
कठीण लिहिणं म्हणजे नाहीच शिक्का मोर्तब कि तुम्हीच कवितालेखनात प्रवीण
मुळात सोपं असो व असो कठीण, कवितेत मन उतरावे
छंद, मात्रा गणांच्याही पलिकडे जाऊन, भाव अत्तरावे
कवितेने द्यावा असीम आनंद अन द्यावी देव दिसल्याची उपरती
नाहीतर कविता असो छंदात नाही तर मुक्त, ती आहे केवळ माती

सारंग कुसरे

मंतर

मना नित्य लक्ष असू दे निरंतर
ऐपतीत राहो “दोघांतील” अंतर
दोघे कोण, प्रश्न असतीलच पडले
अंतर कुठले, intellect असेल गडबडले
तर ऐका सांगतो गोष्ट दोघांची आता
व्हा आतुर, व्हा “all ears” आता 😀
दोन बिंदूतील ”all moving” substance हे
“As-Is” अन “To-Be” मधील अदृश्य distance हे
मनी रुचेल ऐसे "To-Be" ने असावे
मिळवता ते, मन खुबीने हसावे
मना आजच्या “As-Is” वरही बरसू दे फुलं
मना "To-Be" कडे ही अगदी सामंजस्याने झुलं
पण प्रामाणिकपणे जर का आले लक्षात अशक्य होत आहे हेची अंतर
जप स्वतःला आणि मनाला, लोक-लाज पाहू सगळं ते नंतर
"सगळं काही शक्य आहे" भेटतील सांगणारे असंख्य coach
"आमचा घ्या course" म्हणत करतीलही तुला अनंत poach 😎🤓
पण तुझं पळणं, तुझं थकणं, फक्त तुझं तुलाच आहे ठाऊक
तुझ्या इतकं तुझ्यासाठी इतर कुणीही होणार नाही भावुक
तेंव्हा ओळख स्वतःला आणि मनाला आवाक्यात असू दे सदैव "अंतर"
ढळता तोल, मना स्मरू दे हाच practicality ने भरलेला “मंतर” 😉

सारंग कुसरे

Thursday, June 18, 2020

सांग ना जरासे...!

अजून काय ठेवलेस वाढून
सांग ना जरासे आडून आडून

अजून कोणते खळगे खाच
अजून कितीक अघोरी जाच
अजून आकस्मिक कोणती लाट
अजून काळी कुठली पहाट
कळता तयारीस लागू मान मोडून
अजून काय ठेवलेस वाढून
सांग ना जरासे आडून आडून

किती अश्रूंचा असू देऊ साठा
किती निखारी तुडवायच्याय वाटा
किती सांग असू देऊ भान
किती कुठवर पेटेल रान
कुठे घ्यायचे आहे सांग थोडे सावरून
अजून काय ठेवलेस वाढून
सांग ना जरासे आडून आडून

अर्धे अजून उरले आहे
अर्धे जरी सरले आहे
अर्धे दुःख सरले समजू ?
अर्धे सुख पुढे ठरले समजू ?
थोडेतरी सांग देवपण सोडून
अजून काय ठेवलेस वाढून
सांग ना जरासे आडून आडून

म्हणतात अलौकिक तुझे वागणे
म्हणतात सांकेतिक भाषेत तुझे सांगणे
म्हणतात अंत जरी पाहतोस तू
म्हणतात अंती तरीही पावतोस तू
पाव आता, भक्तासी जाशील अधीक आवडून
अजून काय ठेवलेस वाढून
सांग ना जरासे आडून आडून

सारंग कुसरे

Monday, June 15, 2020

खळगी

मास्कवर घालुन आणखी मास्क
fb live चा पार पाडला ठरलेला टास्क
लाइक्स, कंमेंट्स चा धो धो पाऊस
पण मनाला बजावलं तिकडे नको पाहूस
तु फक्त परफॉर्म करत राहा
रसिकांचे आनंदचे साठे भरत राहा
पण टाळ्या शिट्ट्यांचा नव्हता ध्वनी
अतृप्त वाटत होते कुठेतरी खोल मनी
“वन्स मोर” च्या आरोळी ची इतकी सवय
कंमेंट्स, लाईक्स बरोबर वाटत होतं “हे” ही हवय
मास्क शेवटी गळून पडला
मुकं राहुन सगळे बडबडला
कोरड पडली आपसूक घश्याला
इतका खटाटोप शेवटी कश्याला
fb live शेवटी केले बंद
डोळे मिटून गायलो स्वतःसाठी स्वछंद
आता न गरज टाळ्यांची उरली
“वन्स मोर” यावे ऐकु ही इच्छाच नुरली
पण मग प्रश्न खळगी चा आला
आणि लगेच साक्षात्कार नकळत झाला 😉
परत चढवला मास्क वर मास्क
fb live चे निर्मीयले अनंत टास्क 🤨😀

सारंग कुसरे

खापर

घोडं आलं वराती मागुन
सगळ्यांना आता काळजी लागुन
पार “पडेल" लग्न आता
सगळे विचारात मग्न आता
थाळ्यांच्या वरातीतला आठवला नाच
आतिषबाजीचा भ्रामक खोटा जाच
आता जाऊद्या दैवावर सोडा
मिळेल त्यावर खापर फोडा 🤨😛

सारंग कुसरे

गुपीत

अत्तर सगळे उडून गेले
व्हायचे सगळे घडून गेले
हसून झाले भांडून झाले
त्वेषाने विचार मांडून झाले
आता उरला फक्त बोळा
विरहित अत्तर पांढरा गोळा
तेथेच उरते अत्तर कुपीत
तारतम्याचे जेथे अलिखित गुपीत

सारंग कुसरे

Wednesday, May 27, 2020

सडेतोडं (सडेतोड)

हिशोब लागता लागत नाही
काही कळते अगम्य काही
कधी वाटते चिन्हंच चुकले
हव्याश्या उत्तराला हकनाक मुकले
नाहीतर कधी अंकांची गडबड
अविरत ऐकावी ज्यांची बडबड
म्हणतात शेवटी सुटतं कोडं
कुणा सौम्य कुणा सडेतोडं

सारंग कुसरे

३३ मिनिटं

३३ मिनिटांचं सार काय?
खबरदार कुणी विचारणार नाय
विचारलंच जर, हातात बेड्या
चारित्र्यावर रेघोट्या तेढ्या-मेढ्या
नाहीतर काढूं वगैरे अक्कल
“मुर्ख” म्हणायची लढवू शक्कल
निमुट पणे ऐका फक्त
प्रश्न नको, पेटतं भक्तरक्त

सारंग कुसरे

Tuesday, May 5, 2020

Ignorance is bliss, Knowledge is blister 😉

भिडे काकांनी (Maha Bhide) मला आज एक fantastic वाक्य सांगितलं (Ignorance is bliss, Knowledge is blister) आणि कवितेसाठी प्रेरित केलं...भिडे काका तुमच्या साठी खालील कविता...😀

Ignorance is bliss, Knowledge is blister 😉😀

महंतांचं म्हणणं तुम्ही मनात करून ठेवा register
Ignorance is bliss, Knowledge is blister
माहितीचा महापुर दाही दिशांनी थोर
गांगरून गेलंय मनातील कोवळं निरागस पोर
विरोधाभासी मतं, ज्यांची बेरीज शुन्य अंती
मनाची सारखी घालमेल, नको त्या देशी भ्रमंती
झेपेल तितकीच “google” ढोसा, समजलं का mister 🤪
Ignorance is bliss, Knowledge is blister

थोडं wisdom मिळालं ना, बस कि आता चुप
Negative परिस्तिथीला कढवून, नको रे काढु तुप
मनःशांतीला दे झुकतं माप, कठीण हा काळ
सुखापेक्षा समाधानाची रोज ओढ जपमाळ 😇
मनातल्या प्रत्येक कोपऱ्यात लाव positivity चं poster
Ignorance is bliss, Knowledge is blister

शेवटी जे व्हायचं आहे ते होऊनच राहणार
कुठवर दुरपर्यंत तू तरी पाहणार
पुढल्या चार पाउलांचा मिळाला आहे नं प्रकाश
समंजसपणे तितके तर चाल, फक्त होऊ नको निराश 🤟
मनःफळ्यावरून negativity आणि अती-माहिती मिटवायला हाती घे duster
Ignorance is bliss, Knowledge is blister

महंतांचं म्हणणं तुम्ही मनात करून ठेवा register
Ignorance is bliss, Knowledge is blister

सारंग कुसरे

Monday, April 13, 2020

बिग बॉस चाहते है...!

“मले त आत्तापासूनच वाटुन राहालं भ्यांऊ”
“अबे नको न घाबरू, पयले का म्हन्ते उद्या थे त पाऊ”
“अबे तुय का जाते, तुया कड त आहे बाप्पा गॅलरी”
“कायची गॅलरी घेऊन बसला, बहुतेक बंद होईन भाऊ सॅलरी”
“मले त वाट्टे त्याईनं म्हनावं पेरमानं पोसतो तुम्हाले संपेपर्यंत
हे बोहारी”
“बरोबर बोल्ले भाऊ, जगले पायजे लोकं जाई पर्यंत हे बिमारी”
“बघा आता, कळनंच उद्या का सांगते त बिग बॉस”
“होऊ न भाऊ, काहीही सांगो एकचं इच्छा, लोकायचा फक्त कमीत कमी व्हावा लॉस”

सारंग कुसरे

अर्धा शून्य

कुठे कोणती चाले स्पर्धा
पुर्ण शून्य वा शून्य अर्धा
अर्ध्या शून्याचे भेसूर तोंड
शहाण्या हत्तीची पागल सोंड
भरपूर पोटभर पिता पाणी
अंती विषाचीच मात्र फवारणी
अर्धा शून्य लपत नसतो
स्पर्धा करताच अचूक दिसतो

सारंग कुसरे

जमिनींवर पाय त्यांचे आहे आणले गेले..!!

जमिनींवर पाय त्यांचे आहे आणले गेले
संबंध मातीशी ज्यांचेa होते ताणले गेले...
कोण कुठले हत्यार, काय त्याची किमया
हिशोब साऱ्यांचे नकळत मांडले गेले...

प्रकाशझोत पांघरून आधी, होती केशर काया
प्रकाशझोतात येण्या सारेच, आता जुंपले गेले...

कुठल्या आकाशी होते उडत, त्यांचे त्यानांच ठाऊक
कुठेतरी संपते आकाशही, त्यांच्या मनास जाणले गेले...

आघात संपल्यावरी, सुबुध्दीचे फडकेल निशाण
ऐसे विचार करूनही नुसते, मन उधाणले गेले...

जमिनींवर पाय त्यांचे आहे आणले गेले
संबंध मातीशी ज्यांचे होते ताणले गेले...
कोण कुठले हत्यार, काय त्याची किमया
हिशोब साऱ्यांचे नकळत मांडले गेले...

सारंग कुसरे

घरी राहा तुम्ही गुमानं (पोवाडा)

डॉक्टर करी जीवाचे रान
पोलीसही उभा सीना तान
कर्मचारीही लावतोय प्रान
प्रशासनं ही लावतंय जी जान
एकचं विनंती तुम्हा सान
घरी राहा तुम्ही गुमानं जी जी जी !!
हो घरी राहा तुम्ही गुमानं जी जी जी जी जी हो !!!

कुठं नेऊन ठेवील हा रोग
प्रश्न एक विचारी अवघे जग
कुठवर टिकेल याची धग
काय होईल हा गेल्यावरी मग
प्रश्न अनुत्तरीत, परी रोकण्या हा श्वान
घरी राहा तुम्ही गुमानं जी जी जी !!
हो घरी राहा तुम्ही गुमानं जी जी जी जी जी हो !!!

लोक धाऊन येती मदतीला
एकमेकांच्या गरजेला साथीला
दिवसाढवळा अन रातीला
जसे काही तुमच्याच हो दिमतीला
थोडा ठेवा त्यांचा कि हो मान
घरी राहा तुम्ही गुमानं जी जी जी !!
हो घरी राहा तुम्ही गुमानं जी जी जी जी जी हो !!!

लोकहो ऐका देऊन तुम्ही कान
हा रोग जीवघेणा सैतान
थांबवण्या मृत्यु चे थैमान
वाढवण्या ऐक्याची शान
स्वतःचा वाटण्या अभिमान
घरी राहा तुम्ही गुमानं जी जी जी !!
हो घरी राहा तुम्ही गुमानं जी जी जी जी जी हो !!!

सारंग कुसरे

अकरा मिनिटे सदतीस सेकंद

अकरा मिनिटे सदतीस सेकंद
सगळ्यांनी खायचा आहे गुलकंद
सेकंदाचं यथोचित करून पृथकरण
समोसा, हिरव्या चटणीने उदरभरण
काही क्रियांकरता वर्षाचा अवधी
लागेल चर्चा सामानाकरता नगदी
मिनिटे काहीच कर्मांसाठी उपयुक्त
बाकी सांभाळुन घेताहेतच भक्त 🤪

सारंग कुसरे

मातीमोल

म्हणतात “उजव्याचे न कळो कधीही डाव्यास”
तरीही मदतीच्या प्रसिद्धीचा केविलवाणा हव्यास
मदत असो वा आधार असो नाहीतर असे नाका दान
घेणाऱ्या वा देणाऱ्या चा जपला जावा मान
मदत अंती अपुलीच होते, त्याची कसली शोभा
हेच त्रिकाल बाधित सत्य, हाच यातील गाभा
दानाच्या चित्रण, कात्रण, प्रसिद्धीचा हव्यास अघोरी खोल
निरिच्छ नसेल जर दान, तर पुण्य मातीमोल

सारंग कुसरे

बाल्कनी

आता त finally balcony बांधतोच भाऊ
का माहित का कराले लावन जेव्हा वाजतील नऊ

मले त वाट्टे पतंग घीन उडवाले लावन दिडक तास
का माहित साला आकाशात बी असन कोरोना चा वास
पतंग बहुतेक अडवन घिन केतू अन राऊ
आता त finally balcony बांधतोच भाऊ

मले त वाट्टे कराले लावन बालकनीत स्वयंपाक
कोरोना संग नेस्तनाबूत होईल भाऊ इम्रान चा पाक
तिथंच बसुन जेवा घास अडतीस वेळा चाऊ
आता त finally balcony बांधतोच भाऊ

मले त वाट्टे सांगन बालकनीत बाहुलीचं लग्न लावा
सोबत “गो कोरोना गो“ च डिजे version लावा
सोबत सांगन बोलवा चिऊ अन काऊ
आता त finally balcony बांधतोच भाऊ

आता त finally balcony बांधतोच भाऊ
का माहित का कराले लावन जेव्हा वाजतील नऊ 😂😀😛

सारंग कुसरे

पुडी

मले का माहित राजेहो एवढे अर्थ काढसान
मी त देल्ली होती पुडी सोडुन अन तुमी एवढे भांडसान
मले माहित नव्हतं, माया ९ मिंटाचा एवढा पडन किस
तुमी त राजेहो ३ रं महायुद्ध जिकन्या पर्यंत दौडले बुद्धीस
कायचे मांडले गनितं अन कायचा मंगल ग्रह
थोडं डोक्यानं काम घ्यायचा भाऊ करा न निग्रह
आता पैले UNESCO ची येईन पुडी अन मंग NASA चं चित्र
अबे काई त बुद्धी ले लगाम द्या नै त तिसऱ्या संदेशात पाजील गोमुत्र...!!😀🙏😉

सारंग कुसरे

कोरोना उवाच

“आधी मले केलं बहिरं, च्या भैन आता करता का भोकना...?”
मायला असे प्रश्न विचारून ऱ्हायला ना भाऊ आता सगळ्यायले कोरोना...
कोरोना मले म्हने, "राजा तुम्हाले काही बाही सांगुन ऱ्हायला, तुम्हाले असं वाटते...
त्यायचा टीव्ही वर संदेश हाय म्हंटलं का आधी माई फाटते...
कौन आलो मी भारतात च्या भैन, माया नशीबाला पडले होते भोकं...
आता त lockdown भी झाला राजेहो, विमान नाय, बैलबंडी नाय, निस्त गरागरा फिरते माय डोकं...
बोलून घेतो राजेहो मनातलं, नाही त मले करतीन आता मुका...
त्यायच्या पुढल्या संदेशा आधीच पयतो, बघुन चांगला मौका...!”

सारंग कुसरे

पातळी

तपास पातळीचा आहे सुरु
नवा खेळ, आज्ञा “कुरु”
प्रत्येक खेळापरी पातळी ठरेल
आज्ञाधारकाला वाट, कधी भरेल
पातळी जितकी खोल जास्त
आज्ञाधारकासाठी तितुकेच मस्त
पाहिजे वाकवणारा, वाकते पृथा
हेच सांगतात “ह्या” साऱ्या कथा !!😀😛😉

सारंग कुसरे