Friday, December 15, 2023

नवीन पुस्तक - विठू तुझ्या दारी

 राम कृष्ण हरी !!


"विठू तुझ्या दारी” हे माझं सहावं पुस्तक वाचकांच्या हाती सुपुर्त करताना मला अतिशय आनंद होत आहे. या आधी माझा “गोष्ट तुझी माझी” हा कविता संग्रह, “संवादाक्षरे” हा संवाद (लघुकथा) संग्रह, "कविताष्टक" हा आठ ओळींच्या कवितांचा संग्रह प्रकाशित झालेला आहे. या शिवाय मी ज्या ERP (Enterprise Resource Planning) क्षेत्रात काम करतो त्यासंबंधीचे दोन पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत, अनुक्रमे "Microsoft Dynamics 365 FinOps - Fixed Price Project Revenue Recognition In-depth" आणि "Microsoft Dynamics 365 FinOps - Sales Order-based Project Revenue Recognition In-depth". ही सगळी पुस्तकं amazon वर उपलब्ध आहेत.

 वारीहून परत आल्यावर वारीत आलेले अनुभव, वारीत भेटलेले वारकरी, त्यांच्याशी केलेली हितगुज, वारी साठी केलेली तयारी आणि वारी नंतर झालेले बदल या बद्दल मी बऱ्याच ठिकाणी अनुभव कथन केले. पण वेळेची तमा न बाळगता, संपुर्ण डिटेल मध्ये जे मला म्हणायचं आहे, जे विचार मला मांडायचे आहेत, मी वारीवरच्या ज्या कविता केल्या त्याबद्दल मला जे सांगायचं आहे ते सांगण्यासाठी मी ठरवलं की सगळ्या मुद्द्यांना न्याय मिळेल असं एक पुस्तकच लिहायला हवं. ह्या पुस्तकाचा घाट घालायचं आणखी एक कारण म्हणजे मला यात वारीत काढलेले बऱ्यापैकी फोटो समाविष्ट करायचे होते ज्यांनी वारी कशी होती हे दृक माध्यमातून देखील वाचकांना कळेल. या पुस्तकात वारीच्या वर्णनाशिवाय वारी मध्ये असताना आणि वारीनंतर सुचलेल्या बऱ्याच कविता आणि वारीचा खरा अनुभव करून देणारे आणि वारीशी संबंधित जवळपास १५०+ फोटोज आहेत.

आशा आहे आपल्याला हे पुस्तक आवडेल. हे पुस्तक e-book फॉरमॅट मध्ये प्रकाशित केलेलं आहे. ते amazon.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. या लिंक (https://www.amazon.in/dp/B0CQD26GWZ) वर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता. हे पुस्तक kindle वर आणि इतर e-book रिडर्स वरही वाचता येईल.  

आपला नम्र

सारंग जयंत कुसरे 

Wednesday, July 12, 2023

Alandi to Pandharpur Paayi Waari – 2023 / आळंदी ते पंढरपूर पायी वारी २०२३

राम कृष्ण हरी !! आळंदी ते पंढरपूर पायी वारी करण्याची संधी या वर्षी (२०२३) विठ्ठलकृपेने मिळाली. १८ दिवस वारीचा संपूर्ण अलौकिक अनुभव घेऊन खूपच छान वाटले. वारीत असताना मी वारीची रोजनिशी ऑडिओ स्वरूपात रोज रात्री रेकॉर्ड करत होतो आणि आपल्या आप्तेष्टाना पाठवत होतो. spotify वर ती अपलोड करून त्याचे ऑडिओ ब्लॉग्स सद्या करतो आहे.आशा आहे आपल्याला ही श्रवण वारी आवडेल..!!पांडुरंग हरी वासुदेव हरी !! जय जय विठ्ठल श्री हरी विठ्ठल !!

https://spotifyanchor-web.app.link/e/xPwqbjdonBb

Alandi to Pandharpur Paayi Waari – 2023 / आळंदी ते पंढरपूर पायी वारी २०२३

All 17 episodes / संपूर्ण १७ भाग !!

Sarang Kusare / सारंग कुसरे

Thursday, December 31, 2020

३० मिनिटं

तो : ठरलं तर मग... प्रत्येक विकेंड ला फक्त ३० मिनिटांचं सेशन..!

ती : पण ३० मिनिटात होईल सगळं... आय मिन ३० मिनिटांपेक्षा जास्त पण लागू शकतात...बहुदा लागतीलच..!!

तो : लेट्स सी...सुरुवात महत्वाची...!

ती : हम्म...पण हे ऑल ऑफ अ सडन कसं काय सुचलं...म्हणजे व्हाट्स द इन्स्पिरेशन? 

तो : अगं काही नाही...म्हंटल काही तरी नवीन करून पाहू नवीन वर्षात...कारण त्या मागची आपली भावना, आपला ऍटिट्यूड हा पॉसिटीव्ह आहे..!!

ती : पण आठवड्याभरात तर किती तरी गोष्टी खटकू शकतात, कितीतरी गोष्टी "बोलायचंच आहे नंतर" च्या सबबीखाली न बोलताच विसरून जाण्याची शक्यता जास्त आहे आणि शिवाय काही गोष्टीतील तो स्पार्क, ती स्टीम निघुन गेलेली असेल ती वेळ येई पर्यंत...त्याचं काय?

तो : अगं तीच तर खरी मेख आहे यातली... म्हणजे तूच बघ नं... ज्या गोष्टी रागाच्या भरात बोलल्या जाण्याची शक्यता आहे...त्याला एक सुजाण फिल्टर मिळेल...म्हणजे अगदी "रिऍक्ट" करण्या आधी त्या गोष्टीला एक थॉट मिळेल की "अरे, जाऊ दे हे तेव्हाच बोलू" आणि त्यानी कदाचित आपण "रिऍक्ट" न करता आपण "रिस्पॉन्ड" करायला शिकू...हे होईलच याची शाश्वती नाही...पण कुठलीही गोष्ट ट्राय केल्याशिवाय कळात नाहीच...सो लेट्स गिव्ह इट अ हार्टफेल्ट ट्राय !!

ती : (हासत) मला तर तुझा स्वभाव बघता तूच अनेक फाऊल करशील असं आत्ताच वाटतंय...!!

तो : आगे आगे देखो मॅडम होता है क्या...!

ती : अरे साधंच बघ नं...म्हणजे सोमवारी भाजीत मीठ कमी झालं आहे हे तू मला येणाऱ्या शनिवारी सांगणार आहेस का?

तो : देयर यू गो...मला हा प्रश्न अपेक्षित होताच... तर मॅडम त्याचं उत्तर असं आहे की...भाजीत मीठ कमी झालं आहे हे मी तुला तेव्हाच सांगणार पण त्या बद्दल ची नाराजी किंवा चीड-चीड म्हण हवं तर ते फक्त पोस्टपोन करणार आणि ते तुला शनिवारी सांगणार...जर त्या बद्द्लचा माझा त्रागा तोवर टिकला तर...विच इस हायली अनलायिकली...आलं लक्षात?

ती : हे खुपच "आयडियल" होईल असं नाही वाटत तुला? म्हणजे तू सोमवारी ओला टॉवेल गादीवर तसाच टाकला किंवा मला बुधवारी घरकामात मदत नाही केलीस तर मी त्याचा उल्लेख फक्त त्या तीस मिनिटात आणि ते ही काही दिवसांनी शनिवारी करायचा...आय डाऊट धिस विल वर्क..!!

तो : आय नो थोडं कठीण आहे हे पण या फिल्टर मुळे बऱ्याचशा  नको त्या क्षुल्लक गोष्टी एलिमिनेट होतील असं मला वाटतं...! आणि काही औंशी फ्रिकशन कमी होईल कदाचित..! आणि शेवटी घडलं तर काही तरी चांगलंच होईल पण वाईट मात्र काही होणार नाही

ती : वाईट नक्की नाही होणार...हाऊ कॅन यू बी सो शुअर? 

तो : तसे नियमच आखून देणार आहे...रूल्स ऑफ प्ले...यू नो..!!

ती : अरे पण त्या तीस मिनिटात जर शब्दाला शब्द वाढत गेला तर...?

तो : "टाइम-बॉक्स" करायचा प्रत्येक इशू...म्हणजे ऍटलीस्ट तसा प्रयत्न करायचा. फॉर एगझॅम्पल त्या आठवड्यात मला जर तुझ्या एखाद्या वाक्याचा किंवा त्याच्या टोन चा राग आला असेल तर त्या बद्दल आपण एका ठराविक वेळेपुरतं बोलायचं आणि तो इशू मोकळा करायचा...त्याचा पाल्हाळ लावायचा नाही की मागचं काही उकरून काढायचं नाही...हे ऐकताना खूप छान वाटतं आहे...सुरवातीला खूप चुका होतीलही...जास्त वेळ लागेलंही बरेचदा...पण ऍम रिअली अप फॉर इट..!! आपण हळू हळू ते को-कॉउंसेल्लिंग आर्ट मास्टर करू !!

ती : चला तर मग मी लिस्ट करायला घेते..!

तो : हो बट द लिस्ट हॅज टू बी मेंटल... लिखित नाही... 

ती : का बरं...एनी स्पेसिफिक रिजन ?

तो : हो कारण त्याने लिस्ट एंडलेस होणार नाही आणि दुसरं कारण कि मन फक्त त्याचं गोष्टी लक्षात ठेवतं ज्या त्याला ठेवायच्या असतात किंवा जिथे ते जास्त इम्पॅक्ट झालं असतं...बऱ्याचशा मायनर कुरबुरी मन लक्षात ठेवत नाही...असं आत्ता तरी मला वाटतंय..!!

ती : ओके पॉईंट नोटेड..!!

(इतकं बोलुन झाल्यावर "तो" भाजी आणि किराणा आणायला बाहेर जातो आणि किराणा आणल्यावर त्यावर "ती" म्हणते...)

ती : (चिडून) अरे मेथीच्या  २ जुड्या आधीच घरी होत्या...का आणल्यास परत...तू निवडणार आहेस का आणि कोथिंबिरीच्या वर सगळी भाजी आणली...कोमेजली ना ती...तुला साधी भाजी पण नीट आणता येत नाही...आपलं लग्न होऊन आता वीस वर्ष होतील पण.... 

तो : ("ती" चं वाक्य मधेच तोडत) मॅडम या बद्दल आपण शनिवारी बोलू... दे त्या चारही जुड्या, आताच निवडायला बसतो...हा गुंता आपण शनिवारी सोडवू !!

ती : (हासत) वा चांगली पळवाट आहे..!!

तो : आहेच मग..."हीच" तर खरी गम्मत आहे (डोळा मारत हसतो)


सारंग कुसरे

Friday, June 19, 2020

कवितायनमः

लिहावं जर सोपं, तर म्हणतात "जरा खाजवायला देत जा की डोकं"
अन जर का लिहावं गुढ, तर म्हणतात "कशाला गाठताय अनाकलनियतेची टोकं"
बरं जर लिहिलं छंदात,
तर म्हणतात "तुम्ही नकाच पडू न या फंदात"
अन जर मुक्तछंदलो जरासं, तर म्हणतात ,
"छंद, मात्रा, गण ठाऊक आहे का कशाशी खातात ??"
मग वरून परत विचारतात, "वाचलंय का अमकं-तमकं, वाचलाय का हा कवी ??"
अन जर म्हंटल हो , तर म्हणतात, " नुसतं वाचून काय होतं, ती प्रतिभा कवितेत दिसायला हवी"
कसं, काय आणि किती सांगावं या शहाण्यांना दिड
ज्यांना कायम वाटतं की दुसऱ्यांच्या बुद्धीला आणि कल्पकतेलाच तेवढी लागलीय कीड
एक मात्र खरं की, गुढ लिहिण असतं सोपं अन सोपं लिहिणं सगळ्यात कठीण
कठीण लिहिणं म्हणजे नाहीच शिक्का मोर्तब कि तुम्हीच कवितालेखनात प्रवीण
मुळात सोपं असो व असो कठीण, कवितेत मन उतरावे
छंद, मात्रा गणांच्याही पलिकडे जाऊन, भाव अत्तरावे
कवितेने द्यावा असीम आनंद अन द्यावी देव दिसल्याची उपरती
नाहीतर कविता असो छंदात नाही तर मुक्त, ती आहे केवळ माती

सारंग कुसरे

मंतर

मना नित्य लक्ष असू दे निरंतर
ऐपतीत राहो “दोघांतील” अंतर
दोघे कोण, प्रश्न असतीलच पडले
अंतर कुठले, intellect असेल गडबडले
तर ऐका सांगतो गोष्ट दोघांची आता
व्हा आतुर, व्हा “all ears” आता 😀
दोन बिंदूतील ”all moving” substance हे
“As-Is” अन “To-Be” मधील अदृश्य distance हे
मनी रुचेल ऐसे "To-Be" ने असावे
मिळवता ते, मन खुबीने हसावे
मना आजच्या “As-Is” वरही बरसू दे फुलं
मना "To-Be" कडे ही अगदी सामंजस्याने झुलं
पण प्रामाणिकपणे जर का आले लक्षात अशक्य होत आहे हेची अंतर
जप स्वतःला आणि मनाला, लोक-लाज पाहू सगळं ते नंतर
"सगळं काही शक्य आहे" भेटतील सांगणारे असंख्य coach
"आमचा घ्या course" म्हणत करतीलही तुला अनंत poach 😎🤓
पण तुझं पळणं, तुझं थकणं, फक्त तुझं तुलाच आहे ठाऊक
तुझ्या इतकं तुझ्यासाठी इतर कुणीही होणार नाही भावुक
तेंव्हा ओळख स्वतःला आणि मनाला आवाक्यात असू दे सदैव "अंतर"
ढळता तोल, मना स्मरू दे हाच practicality ने भरलेला “मंतर” 😉

सारंग कुसरे

Thursday, June 18, 2020

सांग ना जरासे...!

अजून काय ठेवलेस वाढून
सांग ना जरासे आडून आडून

अजून कोणते खळगे खाच
अजून कितीक अघोरी जाच
अजून आकस्मिक कोणती लाट
अजून काळी कुठली पहाट
कळता तयारीस लागू मान मोडून
अजून काय ठेवलेस वाढून
सांग ना जरासे आडून आडून

किती अश्रूंचा असू देऊ साठा
किती निखारी तुडवायच्याय वाटा
किती सांग असू देऊ भान
किती कुठवर पेटेल रान
कुठे घ्यायचे आहे सांग थोडे सावरून
अजून काय ठेवलेस वाढून
सांग ना जरासे आडून आडून

अर्धे अजून उरले आहे
अर्धे जरी सरले आहे
अर्धे दुःख सरले समजू ?
अर्धे सुख पुढे ठरले समजू ?
थोडेतरी सांग देवपण सोडून
अजून काय ठेवलेस वाढून
सांग ना जरासे आडून आडून

म्हणतात अलौकिक तुझे वागणे
म्हणतात सांकेतिक भाषेत तुझे सांगणे
म्हणतात अंत जरी पाहतोस तू
म्हणतात अंती तरीही पावतोस तू
पाव आता, भक्तासी जाशील अधीक आवडून
अजून काय ठेवलेस वाढून
सांग ना जरासे आडून आडून

सारंग कुसरे

Monday, June 15, 2020

खळगी

मास्कवर घालुन आणखी मास्क
fb live चा पार पाडला ठरलेला टास्क
लाइक्स, कंमेंट्स चा धो धो पाऊस
पण मनाला बजावलं तिकडे नको पाहूस
तु फक्त परफॉर्म करत राहा
रसिकांचे आनंदचे साठे भरत राहा
पण टाळ्या शिट्ट्यांचा नव्हता ध्वनी
अतृप्त वाटत होते कुठेतरी खोल मनी
“वन्स मोर” च्या आरोळी ची इतकी सवय
कंमेंट्स, लाईक्स बरोबर वाटत होतं “हे” ही हवय
मास्क शेवटी गळून पडला
मुकं राहुन सगळे बडबडला
कोरड पडली आपसूक घश्याला
इतका खटाटोप शेवटी कश्याला
fb live शेवटी केले बंद
डोळे मिटून गायलो स्वतःसाठी स्वछंद
आता न गरज टाळ्यांची उरली
“वन्स मोर” यावे ऐकु ही इच्छाच नुरली
पण मग प्रश्न खळगी चा आला
आणि लगेच साक्षात्कार नकळत झाला 😉
परत चढवला मास्क वर मास्क
fb live चे निर्मीयले अनंत टास्क 🤨😀

सारंग कुसरे