Friday, June 19, 2020

कवितायनमः

लिहावं जर सोपं, तर म्हणतात "जरा खाजवायला देत जा की डोकं"
अन जर का लिहावं गुढ, तर म्हणतात "कशाला गाठताय अनाकलनियतेची टोकं"
बरं जर लिहिलं छंदात,
तर म्हणतात "तुम्ही नकाच पडू न या फंदात"
अन जर मुक्तछंदलो जरासं, तर म्हणतात ,
"छंद, मात्रा, गण ठाऊक आहे का कशाशी खातात ??"
मग वरून परत विचारतात, "वाचलंय का अमकं-तमकं, वाचलाय का हा कवी ??"
अन जर म्हंटल हो , तर म्हणतात, " नुसतं वाचून काय होतं, ती प्रतिभा कवितेत दिसायला हवी"
कसं, काय आणि किती सांगावं या शहाण्यांना दिड
ज्यांना कायम वाटतं की दुसऱ्यांच्या बुद्धीला आणि कल्पकतेलाच तेवढी लागलीय कीड
एक मात्र खरं की, गुढ लिहिण असतं सोपं अन सोपं लिहिणं सगळ्यात कठीण
कठीण लिहिणं म्हणजे नाहीच शिक्का मोर्तब कि तुम्हीच कवितालेखनात प्रवीण
मुळात सोपं असो व असो कठीण, कवितेत मन उतरावे
छंद, मात्रा गणांच्याही पलिकडे जाऊन, भाव अत्तरावे
कवितेने द्यावा असीम आनंद अन द्यावी देव दिसल्याची उपरती
नाहीतर कविता असो छंदात नाही तर मुक्त, ती आहे केवळ माती

सारंग कुसरे

No comments:

Post a Comment