Thursday, June 18, 2020

सांग ना जरासे...!

अजून काय ठेवलेस वाढून
सांग ना जरासे आडून आडून

अजून कोणते खळगे खाच
अजून कितीक अघोरी जाच
अजून आकस्मिक कोणती लाट
अजून काळी कुठली पहाट
कळता तयारीस लागू मान मोडून
अजून काय ठेवलेस वाढून
सांग ना जरासे आडून आडून

किती अश्रूंचा असू देऊ साठा
किती निखारी तुडवायच्याय वाटा
किती सांग असू देऊ भान
किती कुठवर पेटेल रान
कुठे घ्यायचे आहे सांग थोडे सावरून
अजून काय ठेवलेस वाढून
सांग ना जरासे आडून आडून

अर्धे अजून उरले आहे
अर्धे जरी सरले आहे
अर्धे दुःख सरले समजू ?
अर्धे सुख पुढे ठरले समजू ?
थोडेतरी सांग देवपण सोडून
अजून काय ठेवलेस वाढून
सांग ना जरासे आडून आडून

म्हणतात अलौकिक तुझे वागणे
म्हणतात सांकेतिक भाषेत तुझे सांगणे
म्हणतात अंत जरी पाहतोस तू
म्हणतात अंती तरीही पावतोस तू
पाव आता, भक्तासी जाशील अधीक आवडून
अजून काय ठेवलेस वाढून
सांग ना जरासे आडून आडून

सारंग कुसरे

No comments:

Post a Comment